सटाणा येथील कारखान्याची १३ लाखांची वीजचोरी पकडली

नाशिक । प्रतिनिधी
महावितरणच्या मालेगाव मंडळ अंतर्गत असलेल्या नाशिक सटाणा मार्गावरील दह्याणे शिवार येथील उच्चदाब ग्राहक मे.भांगडीया अँग्रो यांनी विद्युत मीटरच्या वायरमध्ये हस्तक्षेप करून रिमोट कंट्रोल च्या साहाय्याने वीज चोरी केल्याचे महावितरणच्या स्थानिक पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस झाले असून एकूण ७५ हजार ७६८ विद्युत युनिटची म्हणजे एकूण १३ लाख ६९ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले असून सटाणा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मंगळवारी ७ डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून सदर कारखान्याचे मालक प्रदीप भांगडिया आणि किशोर भांगडिया यांचे विरुद्ध मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला भारतीय विद्युत अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर उच्चदाब ग्राहक मे.भांगडीया अँग्रोचा शेंगदाणे काढणीचा कारखाना असून मंजूर वीजभार हा १८० के.व्ही.ए. असा होता सदर उच्चदाब ग्राहकाचा वीज वापर संशयास्पद वाटल्यामुळे चाचणी विभाग मालेगाव तसेच सटाणा विभाग यांच्या पथकाने सदर ग्राहकाच्या विद्युत मीटरची सखोल तपासणी केली असता सदर तपासणीत ग्राहकाने उच्चदाब मीटरसाठी असलेल्या क्युबिकल मध्ये मीटरच्या मागील बाजूस पी.टी. मधून मीटरला येणाऱ्या वायरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवून वीज वापराची नोंद मीटरमध्ये होणार नाही अशी तजवीज करून वीज चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले.

नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मालेगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता रमेश सानप यांच्या नेत्तृत्वाखाली या तपासणीमध्ये मालेगाव चाचणी विभागचे कार्यकारी अभियंता चंदन तल्लरवार, सटाणा विभागाचे कार्यकारी अभियंता सतिश बोडे, चाचणी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता छगन थैल्ल, मालेगाव मंडळ उपकार्यकारी अभियंता अश्विनी इष्टे व ए. आर. आहिरे, सहाय्यक अभियंता एस. बी. राठोड यांनी ही कारवाई केली.

सदर वीजचोरी मुळे महावितरणचे एकूण ७५७६८ युनिटसचे व रु. १३ लाख ६९ हजार ५६ रुपये एवढे नुकसान झालेले आहे. सदर ग्राहक प्रदीप भांगडिया यांनी वीजचोरीच्या रकमेचा भरणा केलेला असून त्यांच्यावर सटाणा विभागाचे कार्यकारी अभियंता सतिश बोडे यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस स्टेशन, मालेगाव येथे वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.