मोठी बातमी! अनिल देशमुख यांना पुन्हा धक्का, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

मुंबई । प्रतिनिधी

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना न्यायालयाने मनी लॉन्ड्रींग (Money Laundering Case) प्रकरणात पुन्हा एकदा धक्का दिला आहे. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

मुंबई सत्र न्यायालयात विशेष पीएमएल कोर्टात अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. तपास यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्यावरुन अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहारामध्ये सहभागी होते असे प्रथमदर्शी सिद्ध होते आहे, असे निरीक्षण नोंदवत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आरएस रोकडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या प्रकरणातील साक्षीदारांच्या विधानांमध्ये मोठा विरोधाभास आहे. त्यामुळे अशा टप्प्यावर जामीनाबाबत विचारही केला जाऊ शकत नाही, असे रोकडे म्हणाले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलीया या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या असलेले वाहन प्लांट करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सुरु झाल्यानंतर यात मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझे याचा समावेश असल्याचे पुढे आले. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असून सेवेतून त्याला बडतर्फही करण्यात आले आहे. या प्रकरणात पुढे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात परबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला.

दरम्यान, मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अनिल देशमुख यांना इडीने पाच वेळा समन्स पाठवूनही ते चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे इडीने त्यांच्या नावे आऊटलुक सर्क्युलर काढले. त्यानंतर अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाले. अनिल देशमुख यांची जवळपास १२ तास चौकशी केल्यानंतर इडीने त्यांना अटक केली. त्यांना अटक झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उाडली होती.