नाशिक । प्रतिनिधी
दरवर्षी १९ फ़ेब्रुवारीला देशासह राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम, रॅली, देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. कार्यक्रमस्थळी व सर्वत्र पताका व ध्वज उभारले जातात मात्र हे लावताना व उभारताना विद्युत खांब वा वाहिन्या याच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी. शिवजयंती तसेच आनंदोत्सव साजरा करताना वीज यंत्रणापासून सुरक्षित अंतर, सावधगिरी बाळगावी आणि विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावेत असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
शहरासह गावांमध्ये महावितरणच्या उच्च व लघु दाबाच्या विद्युत वाहिन्या, मिनी पिलर, वीजखांब उभारलेले आहेत अशा ठिकाणी विद्युत वाहिन्यांच्या खाली वा विद्युत यंत्रणेजवळ कार्यक्रम, रॅली, देखावे, छायाचित्रे वा मूर्ती उभारू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि आनंदाच्या उत्सवात विद्युत अपघाताचे विघ्न येवू नये यासाठी सुरक्षितता व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
जयंती निमित्त कार्यक्रमस्थळी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येणार आहे तेथे महावितरणकडून तात्पुरती अधिकृत वीज जोडणी घ्यावी. विद्युत वाहिनी उंचीनुसार सुरक्षित अंतरावर फ्लेक्स, बोर्ड, ध्वज लावावे, जेणेकरून विद्युत वहिनीला वा यंत्रणेला स्पर्श होणार नाही. रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी. विद्युत रोषणाईसाठी सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाही किंवा विस्कळीत झालेले नाहीत याची तपासणी करावी. जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा.
उत्सव काळातशॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेले १९१२ किंवा १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.