मोठी बातमी! नाशिक महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्त

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना महानगरपालिकेवर (Nashik Municipal Carporation) प्रशासकाची (Administrator) नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी दिले आहेत.

नाशिक महानगरपालिकेची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपत आहे. परंतू राज्यात कोविडची आपत्ती त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिकेच्या सदस्य संख्येत केलेली वाढ आणि त्यामुळे झालेली प्रभागांची पुनर्रचना, ओबीसी आरक्षण यामुळे हि निवडणूक सातत्याने लांबणीवर पडत होती. मात्र आता लवकरच निवडणूक देखील पार पडतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

तत्पूर्वी नाशिक महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त कैलास जाधव यांनी निवड करण्यात आली आहे. १४ मार्चला कार्यकाळ संपणार असल्याने आणि निवडणुक लांबणीवर पडल्याने आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रशासकाची नियुक्ती ही आगामी महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या दिनांकापर्यंत लागू राहील, अशी प्राथमिक माहिती आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विहित वेळेत घेणे शक्य होणार नसल्याने व तसेच येथील मुदत संपत आल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा निर्णय घेतल्याने निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.