नाशकात चोरट्यांचा धुमाकूळ, एका तासांत लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

नाशिक । प्रतिनिधी

शहरात विविध चार ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये एकूण ४ लाख १२ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला असल्याची माहिती समोर आली आहे. गंगापूर, नाशिकरोड, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.

पहिल्या घटनेत, गंगापूर शिवाजीनगर येथील गणेश गवळी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे. गणेश गवळी आणि अशोक वाघ हे कामानिमीत बाहेर गावी गेलेले असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने या दोघांच्या घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून १० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला आहे. यामध्ये सोन्याचे व चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.

दुसऱ्या घटना सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. नाशिकरोड जवळील एमएससीबी कॉलनीत राहणारे अमित देशमुख यांची लॅपटॉप बॅगअज्ञात चोरट्यांनी लांबवत तब्बल ५५ हजारांसाचा मुद्देमाल चोरी केला आहे. अमित हे रावसाहेब थोरात सभागृह येथे कार्यशाळा कार्यक्रमास हॉलमध्ये उपस्थित असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग लांबविली. या बॅगमध्ये ४० हजार रुपये किमतीचा अँपल कंपनीचा लॅपटॉप, ३ हजार रुपये किमतीचे हेडफोन, २ हजार रुपये किमतीचे किंडल टॅब, दहा हजार रूपये रोख असा मला होता.

तिसऱ्या घटनेत, पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागे राहणाऱ्या मथुरा गायकवाड यांच्याकडे चोरीची घटना झाली आहे. मथुरा या खरेदीसाठी रस्त्याने जात असताना संशयित आरोपीने यांच्याशी गोड बोलुन विश्वास मिळवला. त्यानंतर एक सोन्याची मण्यांची माळ हात चलाखीने लंपास केली.

चौथ्या घटनेत तब्बल तीन लाखांची घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको येथील कामटवाडे परिसरात घडली. येथे राहणारे सुरेश विश्वनाथ होळकर यांच्या घरात तब्बल ३ लाखांची चोरी झाली आहे. होळकर हे घरी नसताना अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य लोखंडी दरवाजाचे लॅच तोडून घराचे लाकडी दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यामध्ये कपाट फोडून चोरटयांनी सोन्या चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारला.