नाशिक | प्रतिनिधी
देशभरात आज 73 व्या प्रजासत्ताक दिनाचा (India’s 73rd Republic Day 2022) मोठा उत्साह आहे. देशभर जल्लोष असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एकूणच काय तर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. राजधानी दिल्ली येथेही सालाबादप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य परेड आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमास राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि लष्करांच्या तिन्ही दल प्रमुखांसह इतर मान्यवरही मोठया प्रमाणावर उपस्थित आहेत.
यावेळी राजपथावर महाराष्ट्रासह १२ राज्यांची आणि ७ मंत्रालयांची चित्ररथ सादर करण्यात आली. महाराष्ट्रातर्फे ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तर नाशिकमधून आर्टिलरी सेंटर च्या ७५/२४ पॅक होवित्झर्स तोफेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मेजर पी शंकर दत्त यांनी या तोफेचे संचलन केले.
देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिन २०२२ च्या निमित्ताने, भारताच्या लष्करी सामर्थ्याची आणि सांस्कृतिक विविधतेची झलक राजपथवर पाहायला मिळाली. यावेळी कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद तिरंगा फडकावत ध्वजाला मानवंदना दिली. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले आणि भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.
यावेळीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, संरक्षण सचिव अजय कुमार आणि लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुख यांचीही उपस्थिती दिसून आली.