आसामच्या मुख्यमंत्र्यांचे चक्क मराठी भाषेत ट्विट.!

By चैतन्य गायकवाड |

दिसपूर : सध्या आसाम (Assam) हे दोन कारणांमुळे चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारे शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena leader and Minister Eknath Shinde) हे गुवाहाटी (Guwahati) मधील हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे तसेच काही अपक्ष आमदार देखील आहेत. या बंडखोर आमदारांची पंचतारांकित हॉटेलमध्ये चांगली बडदास्त ठेवली जात आहे. मात्र, दुसरीकडे आसाममधील पूर स्थिती गंभीर होत आहे. आसाममध्ये (Assam) पूरपरिस्थिती अजूनही गंभीर आहे (flood situation serious in assam). या पूर परिस्थितीने आसाममध्ये आतापर्यंत तब्बल ४५ लाखांपेक्षा अधिक नागरिक बाधित झाले आहे. या पुराचा तडाखा बसल्याने जवळपास १०० पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेल्याची माहिती आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या गटाने ह्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. या मदतीमुळे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Assam CM Himanta Biswa Sarma) यांनी एकनाथ शिंदे आणि आमदारांचे आभार मानले आहे. या मुख्यमंत्र्यांनी चक्क मराठी भाषेत (Marathi language) या आमदारांचे आभार मानले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आसाममधील पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शिवसेनेच्या बंडखोर आणि सहयोगी आमदारांकडून ५१ लाखांची मदत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, “आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय.” आसाममध्ये पुराने खूप नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पुराने सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुराचा लाखो लोकांना फटका बसला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे इतर आमदार व सहयोगी आमदार यांचे ट्विट करून आभार मानले आहे. आसाम पूरग्रस्तांना शिवसेनेचे आमदार आणि सहयोगी आमदारांनी मिळून ५१ लाखांची मदत देण्याची माहिती ट्विट करून दिली आहे. त्यावर या आमदारांचे आभार मानताना सरमा यांनी चक्क मराठी मध्ये ट्विट केले आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले की, ” मा. श्री. शिंदे साहेब व शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांचे धन्यवाद. आपण आसामच्या पूरग्रस्तांसाठी ५१ लाखांची मदत मुख्यमंत्री मदत निधीत केली. आपले खूप आभारी आहोत.”