नाशिकच्या मध्यवर्ती कारागृतील दोन कैद्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक । प्रतिनिधी
नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये दोन कैद्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी झालेल्या या प्रकारामुळे कारागृहात मोठी खळबळ उडाली. पण, कर्मचाऱ्यांनी वेळीच या कैद्यांना थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. विजयकुमार रॉय आणि सागर जाधव अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कैद्यांची नावे आहेत. यामध्ये जाधव याने झाडाला गळफास घेऊन तर रॉय याने हातावर, छातीवर लोखंडी पत्र्याने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, यावेळी कारागृहातील कैद्यांनी आरडाओरडा केल्याने हि घटना निदर्शनास आली.

दरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत कैद्यांना वाचवले. या घटनेची संपूर्ण माहिती कारागृहातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या घटनेनंतर कारागृहातील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एकाच दिवशी दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात अनेकदा कैद्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र अनेकदा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या कैद्यांना वाचविण्यात यश आले आहे. तर काही कैदी गतप्राण झाले आहेत.