गिरणा नदीपात्रात उडी घेत युवकाची आत्महत्या..

नाशिक । प्रतिनिधी

देवळा तालुक्यातून एका धक्कादायक घटना समोर येत आहे. येथील लोहोणेर-ठेंगोडा गावा जवळील गिरणा नदी पात्रात व्हिडीओ कॉल करीत एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका तीस वर्षीय युवकाने गिरणा नदीपात्रात उडी घेत जीवन यात्रा संपविली आहे. सुनील भगवान माळी (रा. दरानेफाटा, ता. बागलाण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

आज सकाळी हि घटना उघडकीस आल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरु होते. अखेर काही तासानंतर या युवकाचा मृतदेह शोधण्यात जवानांना यश आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान या युवकाने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल करीत गिरणा नदी पात्रात उडी घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र व्हिडिओ कॉल कुणासाठी होता, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारणही अद्याप गुलदस्त्यात असून पुढील तपास देवळा पोलीस करीत आहेत.