नाशिक । प्रतिनिधी
नानासाहेब कापडणीस पिता-पुत्राच्या हत्याकांड प्रकरणात आज नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी नवीन खुलासा केला आहे. या हत्याकांडात कापडणीस यांचा शेजारी राहुल जगताप याचा हात असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं.
मात्र, या हत्याप्रकरणात त्याच्या एकट्याचाच हात नसून त्याला मदत करणाऱ्या इतर तीन साथीदारांचा देखील समावेश असल्याचं समोर येतं आहे. विकास हेमके, प्रदीप शिरसाठ, सुरज मोरे अशी या तीन संशयित आरोपींची नावे असून नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी काल रात्री उशिरा या तिघांना औरंगाबाद मधुन अटक केली.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा अमित कापडणीस यांची हत्या डिसेंबर महिन्यात टप्प्याटप्प्याने करण्यात आली होती. या प्रकरणाचा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकात कापडणीस पिता-पुत्र बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र यासंदर्भात पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत राहुल जगताप या युवकाला अटक करत त्याला ताब्यात घेतलं होतं.
त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे तपास केला असता या तपासात संपत्तीच्या हवसे पोटी राहुल जगतापने कापडणीस पिता पुत्राची हत्या केल्याचे निष्पन्न झालं होतं आणि आता परत या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला असून राहुल जगतापला मदत करणाऱ्या त्याच्या तीन साथीदारांचा देखील यात समावेश असल्याचं समोर येतंय. कापडणीस पिता पुत्रांची हत्या पूर्वनियोजित असून नानासाहेब कापडणीस यांची संपत्ती राहुल जगताप आणि त्याचे 3 साथीदार यांनी हडप करण्यासाठी केल्याचा खुलासा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी केला