डी गंगाथरण नाशिकचे नवे जिल्हाधिकारी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डी गंगाथरण हे नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

राज्य शासनाने आज ९ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यानुसार मंत्रालयात उपसचिव असलेले गंगाथरण डी यांची नाशिक येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

सध्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची पुणे शिक्षण आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. गंगाथरण डी. हे २०१३ च्या बॅच चे भारतीय प्रशासकीय सेवा महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत.

दरम्यान, गंगाथरण डी यांनी आपल्या प्रोबेशन काळात प्रकल्प अधिकारी म्हणून नाशिक जिल्ह्यातून सुरुवात केली होती. त्यानंतर ते धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यानंतर धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली वसई विरार महापालिका येथे आयुक्त म्हणून झाली होती तर सध्या ते मंत्रालयात मुख्य सचिव कार्यालय येथे उपसचिव म्हणून कार्यरत होते.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वसई विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरण डी यांची नाशिक येथे बदली झाल्याची अफवा शहरात पसरली होती. या अफवेने महापालिका प्रशासनापासून समाजातील सर्वच घटकांमध्ये खळबळ माजली होती. याबाबतच्या बातम्या देखील तेव्हा स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, महापालिका प्रशासनाने याला दुजोरा दिला नसल्याने ही तेव्हा अफवाच होती. मात्र, आता नाशिकलाच जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्याने चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.