सकाळी रॉड मार्शला ट्विटद्वारे वाहिली श्रद्धांजली, संध्याकाळी शेन वॉर्नचे निधन

नवी दिल्ली । प्रतिनिधी

जगातील क्रिकेट विश्वासाठी दुर्दैवी घटना घडली असून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज फिरकीपट्टू शेन वॉर्न (Australia cricket Shane Warne) यांचं वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे शेन वॉर्नने एका ट्वीटच्या माध्यमातून १२ तासांपूर्वीच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांना श्रद्धांजली वाहिली होती.

दरम्यान गेल्या आठवड्यापासून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू रॉड मार्श यांचे निधन झाले. यावेळी रॉड मार्श यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारं ट्विट शेन वॉर्नने केले होते. या ट्विट मध्ये म्हटलंय की, रॉड मार्श गेल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालं. तो क्रिकेटमधील महान खेळाडू होता आणि अनेक तरुण मुला-मुलींसाठी एक प्रेरणा होता. रॉडला क्रिकेटची खूप काळजी होती आणि त्यांनी क्रिकेटला खूप काही दिलं. विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना त्यांनी खूप काही दिलं. या बिकट काळात मी रॉड आणि त्यांच्या कुटुंबाच्या भावनांसोबत आहे.

रॉडच्या निधनानंतर अशा आशयाचं भावूक ट्विट शेन वॉर्न यांनी सकाळी केले होते आणि संध्याकाळी त्यांच्याच मृत्यूची बातमी आल्याने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील दोन दिग्गज क्रिकेटपट्टूंचे लागोपाठ निधन झाल्याने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, जादुई फिरकीसाठी प्रसिध्द असलेल्या १९९२ मध्ये त्यांनी पहिली टेस्ट मॅच खेळली होती आणि श्रीलंकेच्या मुरलीधरननंतर १ हजार आंतरराष्ट्रीय विकेट (टेस्ट आणि वनडे मॅच) घेणारा दुसरा बॉलर ठरला. वॉर्न यांच्या गोलंदाजीने जगातील प्रत्येक मैदानावर ऑस्ट्रेलियासाठी सामना जिंकून देणारी कामगिरी केली.