नाशिक। प्रतिनिधी
नाशिक (Nashik) महापालिकेच्या (Municipal Corporation) पाठोपाठ आता जिल्हा परिषदेवरही (ZP) प्रशासक राजवट येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत येत्या २१ मार्च रोजी संपत आहे. त्यापूर्वी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या ती शक्यता नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान नाशिक महापालिकेची मुदत १४ तारखेला संपणारा असल्याने पहिल्यांदाच प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यातच नाशिक जिल्हा परिषदेवरही प्रशासक राजवटीचे सावट आहे. येत्या १४ मार्चपर्यंत जिल्हा परिषदेची मुदत आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी गट आणि गणांची रचना होणे गरजेचे होते. त्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न रेंगाळला आहे. हे सारे पाहता सध्या नाशिक जिल्हा परिषदेची प्रशासकीय राजवटीकडे वाटचाल होताना दिसत आहे .
गेल्या पाच वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यातच निवडणूक आचारसंहिता लागली आणि २१ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. मात्र, अजून प्रारूप रचनाही पूर्ण नाही. मग हरकती, त्यावरच्या सुनावणी आणि अंतिम रचना हे पाहता ही निवडणूक लांबणीवर पडणार की वेळेत होणार याची चर्चा सुरू आहे. एकीकडे निवडणुकीची उत्सुकता लागली असताना निवडणूक लांबणीवर पडत असल्याने इच्छुकांचा हिरमोड होताना दिसून येत आहे.
तर ग्रामीण भागात २०११ मधील जनगणनेतुलनेत साधरणतः पाच टक्के वाढ झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, मुलभूत सुविधा विकास कामे साऱ्यांची जबाबदारी ही वाढली आहे. हे पाहता जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या वाढवण्यात आली आहे. नव्या प्रभागरचनेनुसार यंदा जिल्ह्यात ७३ गटांमध्ये ११ गटांची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या एकूण ८४ गट आहेत. तर प्रत्येक गटात ०२ गणांची वाढ झाली आहे. त्यामुळे १४६ वरून गणांची संख्या आता १६८ झाली आहे.