पाच जणांचा खून करणारा गोलू नाशिक पोलिसांच्या ताब्यात

नाशिक । प्रतिनिधी

भुसावळ नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक व रिपाई आठवले गट जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबुराव खरात यांच्यासह चौघांना ठार करणाऱ्या मुख्य संशयित अरबाज अजगर खान उर्फ गोलू खान यास मोठ्या शिताफीने नाशिकरोड पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की तीन वर्षांपूर्वी भुसावळ शहरात पाच जणांच्या हत्येची धक्कादायक घटना घडली होती. भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर 6 आॅक्टाेबर 2019 राेजी हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला हाेता. या घटनेत नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह त्यांच्या घरातील चार जण जागीच ठार झाले होते.

तर घटना झाल्यानंतर संशयितांचा शोध घेण्यात येत होता. यावेळी संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नागरिकांवर हल्ला चढवल्याने त्यात जवळपास तीन जण गंभीर जखमी झाले होते. हे हत्याकांड संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात गाजले होते. विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले होते. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास मुंबईतील सीआयडी विभागाकडे वर्ग करण्यात आला होता.

दरम्यान २००३ पासून घटनेतील प्रमुख अजगर खान उर्फ गोलू खान हा फरार होता. त्यामुळे पोलिसांकडे या संशयित गुन्हेगारास पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. शुक्रवारी नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पथक जेल रोड पाण्याची टाकी परिसरात गस्त घालत होते. यावेळी कर्मचारी मनोहर शिंदे यांना गुप्त बातमीदाराकडून संबंधित संशयिताबाबत माहिती मिळाली. भुसावळ पोलिसांकडे नोंद असलेल्या गुन्ह्यातील संशयित अरबाज खान हा संशयित जेलरोड परिसरात फिरत असल्याची समजले.

यावेळी तातडीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जेलरोड परिसरात सेंट्रल जेल परिसरात सापळा रचण्यात आला. सापळ्यात अडकत असताना संशयित गोलू पोलिसांच्या हातावर तुरी देत असताना पोलिसांनी त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. नाशिक पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार उरकून त्यास पुढील चौकशीसाठी ताब्यात दिले आहे.