मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय, शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले असून यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अखेर शिवसेना कोणाची याचा निकाल लागला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय आता घेतला असून यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कोणाचे यासाठी निवडणूक आयोगाने १२ डिसेंबर २०२२ रोजी सुनावणी घेतली होती, यादरम्यान, शिंदे गट आणि ठाकरे गटाने आपल्या वकिलांमार्फत आपले, आपले दावे टाकले होते. यांनातर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय आला असून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, “निवडणूक आयोगाने  ‘सत्यमेव जयते’ ऐवजी आता ‘असत्यमेव जयते’ असं करावं.  खोक्यांचा कुठंपर्यंत वापर झाला हे या प्रकरणातून दिसून येत आहे. पाण्यासारखा पैसा वाहिला आणि हा पैसा कुठं गेला हे लोकांनी पाहिला आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

ते म्हणाले, “शिवसेना प्रमुख, शिवसैनिकांच्या त्यागातून पक्ष उभा केला. तो पक्ष 40 बाजारबुणगे पक्ष विकत घेतात याची नोंद होणार आहे. निवडणूक आयोगाने आता लोकांचा विश्वासही गमावला आहे. स्वायत्त संस्था कशा प्रकारे संपवल्या जात आहे, हे दिसून येत आहे. निवडणूक आयोग असेल किंवा मग तपास यंत्रणा असेल हे कोणाच्यातरी गुलाम असल्यासारखं वागत आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर केली आहे. मुंबई, महाराष्ट्रातून शिवसेना संपवावी यासाठी सगळा डाव रचला जात आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.