‘किरण मानेचा बोलवता धनी कोण?

मुंबई । प्रतिनिधी
‘मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी किरण मानेने गैरवर्तन केलं. म्हणून त्याला प्रोडक्शन हाउसने हाकलून दिले आहे. त्यामुळे या सोंगाड्यावर कारवाई करा, त्याला शिक्षा झालीच पाहीजे, अशा कठोर शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ (bjp Leader Chitra Wagh) यांनी अभिनेते किरण माने टीका यांच्यावर केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांच्यासंदर्भात अनेक बातम्या पाहायला मिळत आहेत. स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या मालिकेत ते विलास पाटील हि प्रमुख भूमिका करत होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना काढून टाकण्यात आले आहे. या सगळ्या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियादेखील उमटत आहेत. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील मौन सोडले आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून किरण माने यांच्यावर आगपाखड केली आहे. त्या ट्विटमध्ये लिहतात कि ‘मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी किरण मानेने गैरवर्तन केले. म्हणून त्याला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलं. त्यानंतर मानेने नवं नाट्य उभं केलं’, असं चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. सोबतच, महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendera Modi) विखारी टिका करणाऱ्या किरण मानेला सत्ताधारी पाठिशी घालत आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. ‘किरण मानेचा बोलवता धनी कोण?’, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

स्टार प्रवाहवरच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही भूमिका करणारे अभिनेते किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. त्यानंतर काही दिवसात किरण माने यांना त्या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. आपण ही फेसबुक पोस्ट लिहिल्याने आपल्याला मालिकेतून काढले गेले, असा आरोप किरण माने यांनी केला. त्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.