मालेगावात दोन तरुणांवर गोळीबार

येवला । प्रतिनिधी
गोळीबाराच्या घटनेने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पुन्हा एकदा हादरले असून, दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. लूटमार करण्याच्या उद्देशाने अज्ञात टोळक्याने दोन तरुणांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.

मालेगाव परिसरातील पवारवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील मुंबई आग्रा – महामार्गावरील स्टार हॉटेलजवळ ही घटना घडली आहे. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात मोहम्मद अब्रार अताउर रहेमान हा तरुण जखमी झाला आहे. तर त्याचा साथीदार तरबेज अहमद याच्या पाठीत कटरचे वार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मूळचे बिहारचे असणारे मोहम्मद अब्रार आणि तबरेज अहमदर हे एका कंपनीत काम करतात. रविवारच्या सायंकाळी दोघेही काम संपवून पाच वाजता आपल्या रूमवर आले. त्यांतर दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडले. यावेळी रस्त्यावरून जाताना त्यांना तिघा जणांनी अडवले. शस्त्रांचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. मात्र, दोघांनी विरोध करताच मारहाण सुरू केली.

यावेळी या तिघा हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलने गोळीबार केला. यातील एक गोळी अब्रारच्या मांडीत घुसल्याने तो जखमी झाला. तर तरबेजवर एकाने कटरचे वार केले. या हल्ल्यामुळे घाबरलेल्या अब्रार आणि तरबेज यांनी आरडाओरडा करताच हल्लेखोर पळून गेले.

याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस निरीक्षक वसंत भोये यांनी घटनास्थळी जावून पाहणीकेली. तसेच जखमींची विचारपूस केली. तसेच आरोपींचा शोध सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.