येवला येथे मांजात अडकलेल्या बगळ्याची केली सूटका

येवला । प्रतिनिधी

येवला तालुक्यातील धुळगाव येथे नारळाच्या झाडावर पतंगाच्या मांजात अडकलेल्या पक्षाची सुटका करण्यात युवकाच्या प्रयत्नांना यश आले.

येवला तालुक्यात पतंगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मात्र अनेकदा पक्ष्यांना, नागरिकांना मांजामुळे इजा होण्याच्या घटना घडल्या आहेत. तर मांजात पक्षी अडकून जखमी झाले आहेत. अशीच एक घटना धुळगाव येथे घडली आहे. धुळगाव येथील रस्त्यावर नारळाचे झाड आहे. त्यावर पतंगाचा मांजा गुंतलेला होता. बगळा त्या झाडावर बसलेला असतांना हवेने मांजा बगळ्यांच्या मानेला अडकला. बगळ्यांने त्यातून आपली सोडवणूक करण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु मांजा निघाला नाही. झाड ऊंच असल्याने कोणी झाडावर जाण्याची हिंमत दाखवित नव्हते.

बघ्याची गर्दी भरपूर होती. परंतु मांजा बगळ्यांची मान अधिकच घट्ट अडकू लागला. झाडाच्या उंचीवर हा प्रकार घडत असल्याने या बगळ्याची अडकेल्या मांजातून सुटका करण्याकरीता कोणीही पुढे येत नव्हते.

अखेर अक्षय गायकवाड याने सदर प्रकार पाहून क्षणांचाही विलंब न करता झाडावर चढला. बांबूच्या सहाय्याने त्यास खाली उतरवले. सुदैवाने मांजामूळे जखमा झाल्या नव्हत्या. त्याने मरणांच्या दाढेतुन बगळ्यांची सुखरूप सुटका केली.