कस फेडू पांग तुझे! शेतकऱ्याने चक्क घरावरच उभारली कांद्यांची प्रतिकृती

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक जिल्हा आणि कांदा पीक हे जणू समीकरणच बनले आहे. अनेक शेतकरी आपला जीव ओतून कांदा पिकवत असतात. याच कांद्याने अनेक शेतकऱ्यांना रडवले आहे तर अनेकांना घडवले देखील आहे. अशाच एका शेतकऱ्याने कांद्याला सन्मान देत थेट घरावर कांद्याची प्रतिकृती उभारून कांद्याबद्दल आदर व्यक्त केला आहे.

येवला परिसरातील धनकवाडी येथील प्रगतिशील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या दोघे भावंडांनी कांद्यामुळे हक्काचे घर मिळाले. याची जाणीव ठेऊन घरावर चक्क १५० किलो कांद्याची प्रतिकृती उभारली आहे. आज जे घर झाले आहे ते केवळ कांदा पिकामुळेच असाच संदेश त्यांना यामधून दिला आहे. घरावरील १५० कांदा आता येणाऱ्या-जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. कांद्यासाठी प्रसिध्द असलेल्या (Nashik) नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा अनोखा प्रयोग केल्यामुळे एक वेगळीच चर्चा रंगलेली आहे.

कांदा पीक हे नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे पीक मानले जाते. करणं जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणावर होते. या कांदा पिकामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे तर अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. मात्र याच पिकामुळे अनेकांची घरे उभी राहिल्याचे चित्रही आजूबाजूला पाहायला मिळते. असेच हे उदाहरण म्हणावे लागेल. जिल्ह्यात ऊस या पिकाबरोबर कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक घेतले जाते. उत्पादन वाढीच्या दृष्टीने हा (Onion Crop) कांदा लागवडी मोठ्या प्रमाणावर केली जाते.

साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या दोघे भावंडांना मिळून तीस एकर शेती आहे. पण येवला तालुका हा नेहमी दुष्काळी तालुका म्हणून राहिला आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे दहा ते पंधरा एकर शेतामध्ये कांद्याचे पीक घेतले खर्च वजा जाता पंधरा लाख रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहिला. यानंतर त्यांनी घर बांधण्याचा निर्णय घेतला. शेतात घर बांधले आणि कांदा हा लासलगाव बाजार समितीत विक्रीला नेला. त्यावेळी लासलगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर बाजार समितीने नुकतेच कांद्याची प्रतिकृती उभारल्याचे त्यांना दिसून आले.

आपणही कांद्यातून चांगला नफा मिळाला असल्याने आपल्याही बंगल्याच्या छतावर ही कांद्याची प्रतिकृती उभारावी म्हणून या अनिल आणि साईनाथ जाधव या दोघे भावंडांनी कांद्याची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला. अखेर त्यांनी घरावर १५० किलोच्या कांद्याची प्रतिकृती उभारली. यासाठी त्यांना १८ हजार रुपये खर्च आला पण आपले घर जे उभे आहे ते केवळ कांद्यामुळेच याची जाणीव ठेवण्यासाठी त्यांनी हा अट्टाहास केला आहे.