भाजप मंत्र्याने मुख्यमंत्र्यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली; वादाला तोंड..

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद अजून विझला नाही तो पुन्हा एकदा भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रतापगड किल्ल्यावर आज 363 वा शिवप्रताप दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित असून त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.

मंगलप्रभात लोढा यांचे वादग्रस्त वक्तव्य

“जसं औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होत, पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले,” मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना केल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आधीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद अजूनही उमटत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

आदित्य ठाकरेंची टीका,

“एकीकडे मिंधे गटातील नेत्यांना गद्दार म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगाशी करणं चूक आहे. ही तुलना होऊच शकत नाही. हा सगळा महाराष्ट्राला कमी लेखण्याचा हा प्रयत्न दिसत आहे,” असे म्हणत आदित्य ठाकरेंनी यावर टीका केली आहे.

प्रतापगड किल्ल्यावर आज 363 वा शिवप्रताप दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिवरायांच्या इतिहासातील एका घटनेशी तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह शिंदे फडणवीस सरकारमधील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले.