ओबीसी आरक्षण, वाढती गुन्हेगारी संदर्भात भाजप रस्त्यावर..!

नाशिक । प्रतिनिधी

भाजपने नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आणि सरकारच्या दोन वर्षाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे आणि नुकताच ओबीसी आरक्षणाला मिळालेली स्थगितीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चाची हाक दिली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील गुन्हेगारी वाढत आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी कठोर पाऊले उचलावी यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.आज सकाळी ईदगाह मैदानावरून या मोर्चाला सुरवात झाली असून ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत. यामध्ये नाशिक भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर दुसरीकडे येत्या काळात नाशिकमधील मनपा निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन त्याचाच तर भाग नसेल? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. नाशिक निवडणुकीवर सर्वच पक्षांचं लक्ष असून सर्वांनीच तयारी सुरु केली आहे.

कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्याकडे राखायची असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठीच भाजपने शहरात विविध कार्यक्रम राबवायला सुरुवात केली आहे. भाजपसमोर सध्या महाविकास आघाडीचे आव्हान आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष जर एकत्र आले तर भाजपची अडचण वाढण्याची शक्यता आहे.