भद्रकालीतील दीडशे वर्षांपूर्वीचा कुंटणखाना पोलिसांकडून सील

नाशिक । प्रतिनिधी

तब्बल दीडशे वर्षांपासून सुरु असलेला भद्रकालीतील कुंटणखाना अखेर नाशिक पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. यावेळी एका महिलेने अंगावर रॉकेल घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्नच केला मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत महिलेची समजूत काढली.

दरम्यान नाशिकच्या मध्यवर्ती परिसर असलेला भद्रकाली भागात हा कुंटणखाना सुरु होता. काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरात सुरू असलेल्या कुंटणखाण्याची माहिती संबंधित पोलिस ठाण्याकडून मागविण्यात आली होती. यादरम्यान भद्रकाली भागात अनेक घरांमध्ये बेकायदेशीररित्या कुंटणखाना सुरू असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांकडून पोलीस आयुक्तांना पाठवण्यात आली.

यानंतर आलेल्या माहितीनुसार आयुक्तांनी संबंधित कुंटणखाना चालकांवर कारवाई करण्याचे भद्रकाली पोलिसांना आदेशित केले होते. पोलीस ठाणेमार्फत सात दिवसांपूर्वी कुंटणखाना चालकाना नोटीस पाठवून कुंटणखाना बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच येथील देहविक्री करणाऱ्या महिलांना येथून स्थलांतरित होण्यास सांगितले होते.

मात्र पोलिसांनी नोटीस देऊन देखील कुंटणखाना बंद करण्यात आला नाही. यावेळी पोलिसांनी मघ्यतानस्थळी दाखल होत महिलांना घराबाहेर पडण्यास वेळ दिला. मात्र येथील महिलांनी घराबाहेर पडण्यास नकार देत विरोध केला. घटनास्थळी असलेला महिला पोलिसांनी सदर महिलांची समजूत काढत त्यांना बाहेर काढले. यावेळी संदर्भ रुग्णालयाच्या मागील भिंतीस लागून असलेल्या कुंटणखान्यावर कारवाई करत सील करण्यात आले.