नाशिक । प्रतिनिधी
आदिवासी विकास महामंडळातील सुमारे साडेतीनशे कोटींच्या नोकरभरती घोटाळ्या प्रकरणी दोन बड्या अधिकाऱ्यांसह भरती करणाऱ्या पुण्यातील खासगी कंपनीच्या विरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी काम करणाऱ्या आदिवासी विकास महामंडळावर या घटनेने नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही वर्षांपूर्वी आदिवासी विकास महामंडळात नोकर भरती निघाली होती. यावेळी अनेक होतकरू तरुणांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी या ठिकाणी अर्ज केले होते. परंतु या भरती प्रक्रियेत पात्र तरुणांना डावलत बोगस भरती केल्याचे आरोप उमेदवारांकडून करण्यात आले होते. त्यांच्यामते इतर उमेदवारांकडून यासाठी पैसे उकळण्यात येऊन त्यांना पात्र ठरविण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर तत्कालीन खासदार हरिशचंद्र चव्हाण यांनी याबाबत तक्रार देखील केली होती.
मात्र त्यानंतर अनेक वर्ष उलटून गेले तरी याबाबत कारवाई करण्यात आली नव्हती. अनेक दिवसांच्या कालावधीनंतर आता नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन प्रशासन अधिकारी नरेंद्र मांदळे, तत्कालीन अप्पर आयुक्त अशोक लोखंडे आणि कुणाल आयटी कंपनीचा समावेश असून या घटनेने आदिवासी विभागात खळबळ उडाली आहे.
आदिवासी तरुणांच्या विकासासाठी त्याचप्रमाणे आदिवासी बहुल नागरिकांच्या विकासासाठी आदिवासी विकास मंडळ ओळखले जाते. या माध्यमातून विशेष योजना, नोकरभरती आदी सेवा दिल्या जातात. मात्र येथील अधिकारीच घोटाळ्यात अडकल्याने आदिवासींनी कोणाकडे दाद मागायची असा सवाल उपस्थित होत आहे.