राज्यस्तरीय कविता महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रा.संदीप जगताप

नाशिक । प्रतिनिधी

कन्नड तालुक्यात वाड्मयीन व सांस्कृतिक चळवळ गतिमान व्हावी. नवकवी लेखकांना लिहिण्यासाठी प्रेरणा मिळावी, वाचन संस्कृती अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी. कवी आणि कवितेचा यथोचित सन्मान व्हावा. वर्तमान प्रश्नावर व्यापक विचार मंथन व्हावे तसेच कविंना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने राष्ट्रमाता जिजाऊ- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी राज्यस्तरीय कविता महोत्सवाचे आयोजन त्रैमासिक तिफण व भाषा, साहित्य , संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नड यांच्या तर्फे करण्यात येते. या वर्षीच्या तिफण राज्यस्तरीय कविता महोत्सवाच्या अध्यक्षपदी कवी प्रा. संदीप जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

प्रा. जगताप हे चिंचखेड ता.दिंडोरी जि. नाशिक येथील रहिवाशी असून ग्रामीण व शेतकरी जीवनाचे दाहक वास्तव शब्दबद्ध करणारे शेती माती चे कवी आहेत. भुईभोग हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध असून अनेक कथा, कविता, ललित, प्रासंगिक लेखन त्यांचे विविध दिवाळी अंक, नियतकालिके आणि वर्तमान पत्रातून प्रसिद्ध झालेले आहे. अनेक साहीत्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांनी सहभाग घेतला आहे. ते उत्तम वक्ते असून शिवशाही ते लोकशाही या विषयावर त्यांनी राज्यभर व्याख्याने दिली आहेत. गाव व्हिलेज झालंय हा त्यांचा कवितेचा प्रयोग प्रसिद्ध आहे.

अनेक टी.व्ही. चॅनल्सवर त्यांनी कविता वाचन केले आहे. त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. शेती प्रश्नाचे ते अभ्यासक असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी प्रभाकर शेळके, दासू वैद्य, प्रतिभा अहिरे यांनी कविता महोत्सवाचे अध्यक्षस्थान भूषविलेले आहे. हे चौथे वर्ष आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच जाहीर करू अशी माहिती कविता महोत्सवाचे संयोजक तथा तिफण चे संपादक प्रा. डॉ. शिवाजी हुसे , डॉ. रामचंद्र झाडे,प्रविण दाभाडे, डॉ. सूर्यकांत सांभाळकर, अरुण थोरात, संदीप ढाकणे, प्रा. रमेश वाघचौरे, ज्ञानेश्वर गायके, भीमराव सोनवणे, का. का. थोरात, सुरेश आवटे, संदीप वाकडे, भरत सोनवणे, कवी दापके, अजय दवंडे, शिवनाथ गायकवाड, यांनी दिली आहे.