येवला । प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या ३० व्या दिवशी येवला आगारातील सेवा सुरू करण्यात यश मिळाले असल्याची माहिती आगरप्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली आहे. येवला आगारातून पोलीस बंदोबस्तात दोन बस नाशिक साठी रवाना करण्यात आल्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण करण्यात यावे यासाठी संप पुकारला असून सुमारे एक महिन्यापासून प्रवाशी वाहतूक बंद आहे. सामान्य प्रवाशांसाठी जीवनवाहिनी असलेली लालपरी बंद असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून खासगी वाहतूकदार अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करत असल्याने प्रवाशीही मेटाकुटीला आले आहेत. एकीकडे शाळा सुरु झाल्या आहेत तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी लालपरी बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाही खेळखंडोबा झाला आहे. येवला आगारातून एसटीची सेवा सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. येवला नाशिक बससेवा ही सेवा सुरळीतपणे सुरू रहाणार असल्याची माहिती आगारप्रमुख गुंड यांनी दिली आहे.
येवला आगारात दोन चालक व दोन वाहक रुजू झाले आहेत. यातील एक चालक सुमारे एक वर्षांपासून पायाला दुखापत असल्याने चालकाचे कर्तव्य करत नसून आगारातील डिझेल पंपावर कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे या चालकाला प्रशिक्षण देणे गरजेचे असतांना देखील कर्तव्यावर पाठवण्यात आल्याने एसटी प्रशासनाच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त होत आहे.
रुजू झालेल्या दोन वाहकांपैकी एका वाहकाचे एसटी सेवेतील काही महिने बाकी असल्याने त्या वाहकाला कारवाईचा बडगा दाखवून हजर करून घेतल्याची कुजबुज कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. एसटी संपाच्या ३० व्या दिवशी येवला आगारातुन एसटी सेवा सुरू करण्यात प्रशासनाला यश आले आहे. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला प्रवाशांच्या आनंदातच एसटी प्रशासनाचे समाधान आहे. येवला आगारातील जास्तीतजास्त फेऱ्या सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. – प्रशांत गुंड, आगारप्रमुख येवला