नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, तांदळाचा साठा जप्त

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या पंचवटी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शालेय पोषण आहारात वाटल्या जाणाऱ्या तांदळाचा मोठा साठा करून काळाबाजार करणारे गोदामावर छापा टाकला. या कारवाईत आठ ते दहा लाखांचा माल जप्त केला असल्याची माहिती समोर येत आहे.

पंचवटी परिसरामध्ये शासनाचा तांदूळ भरलेला माल एका खाजगी गोडावूनमध्ये असल्याची माहिती नाशिक पोलिसांनी मिळाली होती. याबाबत स्थानिक महिला बचत गटाच्या माध्यमातून हि माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे नाशिक पोलिसांनी छापा टाकून तांदळाचा साठा जप्त केला. त्यानंतर जप्त केलेला तांदूळ निकृष्ट आणि खराब असल्याने अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासणी केली.

दरम्यान तपासणी नंतर निदर्शनास आले कि, दोन वर्षांपूर्वी सेंट्रल किचनच्या माध्यमातून शाळेय पोषण आहार वाटप करणारा तांदूळ आहे. हा माल खाजगी वाहनात भरून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ब्लॅकने विकला जाणार असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. खराब झालेला तांदूळ कुठे वापरला गेला आहे, याबाबत चौकशी सुरू असून हा माल पकडून दिलेल्या बचत गटाच्या महिलांचे कौतुक केले जात आहे.