मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा, विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी

मुंबई | प्रतिनिधी

ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation News) आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari) यांनी अखेर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर होता त्यामुळे महापालिका जिल्हा परिषद निवडणुका देखील लांबणीवर पडत होत्या दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली.

निवडणूक आयोग सुधारणा विधेयक राज्यपालांकडे सहीसाठी पाठवण्यात आले होतं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. राज्यपालांच्या भेटीला शिष्टमंडळ गेले होते. त्यानंतर राज्यपालांनी या विधेयकावर सही केल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

राज्य सरकारने विधिमंडळात ओबीसी आरक्षण संदर्भात विधेयक मंजूर केले होते. या विधेयकावर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखेर सही केली आहे. विधेयक मंजूर झाल्यानतंर राज्य निवडणूक आयोगाकडे फक्त निवडणूक घेण्याचे अधिकार असणार आहेत. निवडणूक वगळता सर्व अधिकार राज्यसरकारकडे येतील.

यामुळे आता प्रभाग रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाकडे देत नाही तोपर्यंत निवडणूक जाहीर करता येणार नाही. दरम्यान राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याने राज्यात राजकीय ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.