असा असणार दिंडोरीतील आदिवासी औद्योगिक क्लस्टर

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील दिंडोरी तालुका मुख्य बाजारपेठ पासून जवळ आणि इतर आदिवासी तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. रस्ते आणि पाण्याची उपलब्धता यांचा विचार करता दिंडोरी तालुक्यात आदिवासी औद्योगिक समूह ट्रायबल इंडस्ट्रियल कसर क्लस्टर प्रस्तावित करण्यात आले आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेतून प्रयत्नांनाही यश आले आहे.

या आदिवासी औद्योगिक समूहाची शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली आहे. दिंडोरी तालुक्यातील टोमॅटो द्राक्ष कांदा व भाजीपाला पिकासोबत तांदूळ, नागली, खुरसणी, वरई ही पिके असून या वरील विविध प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे शक्य होणार आहे. दिंडोरी तालुक्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याने नाशिक शहरापासून ते 20 किमी अंतरावर गुजरात राज्य मार्गावरील जांबुटके शिवारात हा प्रकल्प प्रस्तावित आहे.

आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने उद्योजकांसाठी तयार करणे, कृषी प्रक्रिया, इंजीनियरिंग, आदिवासी हस्तकला, लॉजिस्टिक आणि कौशल विकास तसेच गाळे या स्वरुपात शेडचे बांधकाम करण्यात येईल. सोबत तांत्रिक पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण, शेती प्रक्रिया, उद्योग उभारणी, शेतमालाची स्वच्छता वर्गीकरण आणि पॅकिंग सुविधा निर्यातीस चालना देण्यासाठी प्रशिक्षण आणि वर्कशॉप युनिटची उभारणी करण्यात येईल. आदिवासी औद्योगिक समुहामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन या परिसराचा विकास होण्यास चालना मिळणार आहे.

प्रस्तावित आदिवासी औद्योगिक समूह ही नावीन्यपूर्ण संकल्पना असून आदिवासी उद्योजकांना एका छताखाली सुविधा उपलब्ध करुन आदिवासी समाजात उद्योजकता विकास घडून आणणे हा मुख्य उद्देश आहे. आदिवासी उद्योजकांना उद्योगांसाठी वीज, पाणी, रस्ते यांची उपलब्धता करण्यासोबत मोठे मध्यम आणि लहान उद्योग एकाच ठिकाणी विकसित करण्यात येतील. – नरहरी झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र