ओझरमधील बैलगाडा शर्यतीवर कारवाई होणार

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकजवळील ओझरमध्ये मोठ्या जल्लोषात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या शर्यतीला परवानगी घेतली नसल्याने कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.

सर्वोच्च नायायालयाने काही दिवसांपूर्वी बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली. त्यामुळे राज्यभर जल्लोष साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बैलगाडा शर्यत सुरु करण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील ओझर येथे आज बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र या बैलगाडा शर्यतीवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली असून आयोजकांनी या शर्यतीला परवानगीच घेतली नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले कि, कुठलीही शर्यत आयोजित करण्याआधी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असताना ही शर्यत विनापरवानगी होत आहे. त्या शर्यतीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र दुपारच्या सुमारास हि शर्यत सुरु झाली असून या ठिकाणी बैलगाडा प्रेमींनी प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील पहिलीच बैलगाडा शर्यत होत आहे. त्यामुळे आजच्या शर्यतीकडे राज्यातील बैलगाडाप्रेमींचे लक्ष लागून होते. हि शर्यत अनुभवण्यासाठी परिसरातील हजारो बैलजोड्या या स्पर्धेसाठी दाखल झाल्या होत्या. बैलगाडा शर्यत प्रेमीं देखील आनंद व्यक्त करीत होते. मात्र आता नाशिक प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.