सावधान! वीज चोरी करू नका, महावितरण ऍक्शन मोडवर

नाशिक । प्रतिनिधी

वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवीत नववर्षाच्या सुरुवातीला ०५ जानेवारी २०२२ या एकाच दिवशी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये महावितरणच्या नाशिक मंडळात एकूण ६०२ अभियंते व जनमित्रांचा समावेश असलेल्या पथकाने वीज चोरी व गैरवापर करणाऱयांविरुध्द आकस्मिक कारवाई केली.

यामध्ये एकूण २ हजार ८१२ विद्युत ग्राहकांची विद्युत जोडणीची तपासणी करण्यात येऊन त्यामध्ये नाशिक शहर १ व २, नाशिक ग्रामीण आणि चांदवड या चारही विभागामध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार ३४६ जणांवर तर कलम १२६ नुसार ३५ ग्राहकांवर अशा एकूण ३८१ विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात महावितरण सातत्याने प्रयत्नशील असून नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते धनंजय आहेर (नाशिक शहर १), माणिकलाल तपासे(नाशिक शहर २), राजाराम डोंगरे(नाशिक ग्रामीण) व रवींद्र आव्हाड(चांदवड) यांचेसह विविध पथकामध्ये अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणा-या ग्राहकांमध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये विभागनिहाय नाशिक शहर १ मध्ये ४, नाशिक शहर २ मध्ये ७३, नाशिक ग्रामीणमध्ये १८० आणि चांदवडमध्ये ८९ जणांवर कारवाई करण्यात आली.
तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्याविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये नाशिक शहर १ मध्ये ११, नाशिक शहर २ मध्ये ११, नाशिक ग्रामीणमध्ये ०७ आणि चांदवडमध्ये ०६ जणांवर कारवाई करण्यात आली अशा प्रकारे एकूण कलम १३५ व कलम १२६ नुसार ३८१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये नाशिक मंडळातील २ हजार ८१२ विद्युत ग्राहकांची मीटर तपासणी करण्यात आली होती. तर अनधिकृतपणे वीज तारांवर आकडे अथवा हुक टाकणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे. वीज देयक न भरणाऱ्या ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता अशा ठिकाणी सुद्धा बेकायदेशीर वीज वापर करताना आढळल्याने त्यांचे विरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात आली.

वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.