नाशिक । प्रतिनिधी
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. या पाच पौकी तीन राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार आहे. यापैकी उत्तर प्रदेश राज्यात राष्ट्रवादी आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात आघाडी होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही घोषणा आज (दि.११) केली.
ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. गोवा राज्यात सत्तापरीवर्तन होण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणीही महाविकासआघाडीचा प्रयोग व्हावा, असे शरद पवार म्हणाले. उत्तर प्रदेश राज्यातील जनतेला आता परीवर्तन हवे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष हे आघाडी करुन जनतेची इच्छा पूर्ण करतील. सपा, एनसीपी आणि सहकारी पक्षांची युती म्हणजे लोकांसाठी निवडलेला पर्याय असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. उत्तर प्रदेशची जनता आपल्याला पाठीबा देईल असा विश्वसही शरद पवार यांनी म्हटले आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाने आदर्श अचारसंहिता लागू करत उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या पाचपैकी तीन राज्यामध्ये निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहेत. यापैकी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये लढणार आहेत.
देशाचे लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आता अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक ही प्रामुख्याने भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यातच लढली जाणार असल्याचे अनेक राजकीय तज्ज्ञांनी सांगितले होते. मात्र आता या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षासोबत युती करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशातील निवडणुका चांगल्याच रंगणार आहेत.