Home » तपोवन येथील सिटीलिंक स्टेशन नाशिकरोडला स्थलांतरित होणार

तपोवन येथील सिटीलिंक स्टेशन नाशिकरोडला स्थलांतरित होणार

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

तपोवन रोड येथील बसस्थानकाजवळ सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून मुख्य रस्त्यावर सिटीलिंकच्या बस पार्क करण्यात येतात. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व त्यांच्या शिष्टमंडळाने नाशिक सिटी लिंकचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांना निवेदन देत कारवाई न केल्यास पोलिसात तक्रार करून आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी १५ दिवसांच्या आत बस आगर नाशिकरोड येथे स्थलांतरीत करणार असल्याचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांना सांगितले.

नाशिक महानगरपालिकेने नाशिक मधील नागरिकांच्या सोयीकरिता बससेवा सुरु केली. या बस उभ्या करण्याकरिता तपोवन येथील श्री.जनार्दन स्वामी आश्रमासमोरील बाजूची जागा नाशिक महापालिकेने राखीव केली. राखीव असलेली जागा रस्त्यापासून आत असल्याने सिटीलिंकचे बस कर्मचारी नाशिक महानगरपालिकेने दिलेल्या जागेत बस उभी न करता थेट रस्त्यावर दोन्ही बाजूने बस उभ्या करतात. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळी व संध्याकाळी फिरण्याकरिता निघालेल्या नागरिकांना सदर ठिकाणावरील फुथपाथ वर चालता येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागातून वाट काढत त्यांना जावे लागते. सकाळी एकाच वेळी सर्व बस बाहेर निघत असल्याने रहदारी असलेल्या औरंगाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रफिक जाम होत असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व बस उभ्या असल्याने वाहनधारकांना पुढील वाहनांचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूस बस उभ्या केल्याने नागरिकांनी त्यांना जाब विचारल्यास सिटीलिंकचे कर्मचारी नागरिकांसोबत अरेरावीची भाषा करतात.

तपोवन रोडवर स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात फिरण्याकरिता येतात असे असताना देखील सिटीलिंकचे बस कर्मचारी या ठिकाणावरून जोरात बस ने-आण करतात. याच प्रमाणे शहरातील इतर ठिकाणी सुद्धा बस जोरात चालविण्याची शर्यत यांच्यामध्ये लागलेली असते असे चित्र सर्वत्र दिसत आहे. बस जोरात नेताना बस स्थानकावर देखील बसचालक बस थांबवीत नाही.

नाशिक महानगरपालिकेने दिलेल्या जागेत बस उभ्या करून रहदारीचा व फिरण्याकरिता येणाऱ्या नागरिकांचा मार्ग मोकळा करावा अन्यथा पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवून स्थानिक रहिवाश्यांसोबत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी शादाब सैय्यद, नितीन-बाळा निगळ, जय कोतवाल, किरण पानकर, विक्रांत डहाळे, डॉ.संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, संदीप खैरे, संतोष जगताप, सागर बेदरकर, विशाल डोके, राहुल कमानकर, स्वप्निल वाघ, रामेश्वर साबळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!