सिडको येथे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक

नाशिक । प्रतिनिधी

शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. मंगळवारी शहरातील सिडको येथे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तरुणाला रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

नाशिक शहरात मांजावर बंदी असतांना सर्रास विक्री करण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येते आहे. एका बाजूने पोलीस कारवाई करत असताना देखील दुकानदार छुप्या पद्धतीने अजूनही नायलॉन मांजा विकत असल्याचे चित्र आहे. अशा विक्रेत्‍यांवर सध्‍या कारवाई सुरू आहे. दरम्यान नाशिक पोलिसांनी गेल्या काही दिवसांत सिडको भागातील चार जणांवर कारवाई केली होती. मात्र आज पुन्हा गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी मांजाची वाहतूक करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून पोलीस, विविध संघटना संस्था नायलॉन मांजा वापरू नये, यासाठी जनजागृती करताना दिसत आहेत. तसेच पालिकेच्या वतीने नो नायलॉन मांजा हि मोहीम देखील राबविण्यात येत आहे. मात्र असे असताना देखील नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकच्या सिडको भागातील घटना गेल्या सहा दिवसात पाच जणांवर कारवाई करण्यात आली असून यातील एकावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. यानंतरही नागरिकांनी आता समजदारी दाखवून पतंग उडविण्याची हौस दुसऱ्याच्या जिवावावर उठणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

तर आजही नायलॉन मांजामुळे एका पक्षाला आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे वारंवार आवाहन आणि कारवाई करून देखील शहरात मांजा विक्री सुरूच असल्याने पोलिसांनी ठोस पाऊले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. येत्या काही दिवसांत संक्रात सण येऊ घातल्याने यामध्ये किती बदल होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.