बैलगाडा शर्यत प्रकरणी माजी आमदारांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी

ओझर येथे विनापरवानागी आयोजित बैलगाडा शर्यतीवर माजी आमदारांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकजवळील ओझरमध्ये मोठ्या जल्लोषात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यत प्रेमींनी गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले होते. विशेष म्हणजे या शर्यतीला परवानगीच घेतली नसल्याचे समोर आले होते.

तर जिल्हाधिकारी सुरज मांढरे या शर्यतीवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. कारण कुठलीही शर्यत आयोजित करण्याआधी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असताना ही शर्यत विनापरवानगी होत होती. त्यानंतर आयोजकांनीच गर्दी आणि कोरोनाचे कारण देत शर्यत रद्द केली.

दरम्यान या प्रकरणी शर्यतीसाठी न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध मोडल्याने शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह इतर नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील पहिलीच बैलगाडा शर्यत होती. मात्र या शर्यतीत नियम मोडल्याने पहिला गुन्हा सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदारांवर दाखल करण्यात आला आहे.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागू केले असतांना त्यांच्याच नेत्याकडून सोशल डिस्टन्स आणि मास्कचे नियम पायदळी तुडवल्याने बैलगाडा शर्यतीवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.