परीक्षा फी भरली नाही म्हणून खोलीत डांबून ठेवले!

नाशिक । प्रतिनिधी
चांदवड येथील डी.एम. भन्साळी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना फी न भरल्यानं परीक्षेला बसू न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी उपमुख्याध्यापक तुषार वैद्य यांच्यावर अखेर दिड महिन्यानंतर चांदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

एकीकडे कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा या ऑनलाईन सुरु होत्या. त्यातच काही अंशी निर्बंध शिथिल झाल्यानंतर शाळा सुरु झाल्या होत्या. त्यातच अशा पद्धतीचे प्रकार समोर आल्यानंतर शिक्षणाचा बाजार मांडल्याचे उदाहरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. चांदवड शहरातील डी.एम. भन्साळी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये येथील विद्यार्थी शिक्षण घेतात. दरम्यान आक्टोबर महिन्यातील २१ तारखेला हिंदी विषयाची परीक्षा होती. यावेळी यश घुले हा विद्यार्थी पेपर देत असताना काही वेळानंतर उपमुख्याध्यापक असणाऱ्या तुषार वैद्य यांनी पेपर हिसकावून घेतला होता.

यानंतर यश याने विचारणा केली असता तुमची फी जमा झाल्याशिवाय तुम्हाला पेपर देता येणार नाही, असे म्हणत यश घुले सह इतर काही विद्यार्थ्यांना वैद्य यांनी परीक्षा संपेपर्यंत एका खोलीत डांबून ठेवले होते. यानंतर यश याने घरी येत हि हकीकत सांगितली असता याबाबत यशच्या पालकांनी स्थानिक पालक शाळा प्रशासनाकडे विचारपूस केली होती. मात्र या ठिकाणी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती.

अखेर यशचे पालक शांताराम घुले यांच्यासह इतर पालकांनी चांदवडच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेत तक्रार केली. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली असता तुषार वैद्य हे दोषी आढळून आले आहेत. गट शिक्षाणाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना याचा जाब विचारत कारवाईचे आदेश दिले होते. अखेर दिड महिन्यानंतर उपमुख्याध्यापक तुषार वैद्य यांच्यावर चांदवड पोलीस स्थानकात काल गुन्हा दाखल झाला आहे.

आपल्या पोरांची जडणघडण ज्यांच्या हाती आहे, त्यांच्या विरोधात आवाज उठवला तर त्यांचं आगामी काळात शैक्षणिक नुकसान तर होणार नाही ना या भीतीमुळे अनेक पालकांनी तोंडावर बोट ठेवले. मात्र अन्यायाविरोधात अरुण शेळके व मी शांताराम घुले शेवटपर्यंत लढत राहिलो, त्याचाच एक टप्पा म्हणून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांकडून कुठल्याही दबावाला बळी न पडता निःपक्षपाती पणे चौकशी होईल अशी अपेक्षा शांताराम घुले व इतर पालक व्यक्त करीत आहेत.