नाशिक । प्रतिनिधी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात केलेले आंदोलन भोवले असून आमदार सीमा हिरे यांच्यासह त्यांचे पती व इतर दहा जणांवर अंबड व सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विना परवानगी नाना पटोले आणि आघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केल्याप्रकरणी भाजप आमदार सीमा हिरे आणि त्यांचे पती महेश हिरे, नगरसेविका प्रतिभा पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा एकूण १० जणांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर सातपूर पोलीस ठाण्यात देखील आमदार सीमा हिरे, त्यांचे पती महेश हिरे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेविका इंदुताई नागरे, सातपूर भाजप मंडळ सरचिटणीस भगवान काकड यांसह आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा एकूण १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी यांनी आंदोलन करत पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केले होते. आघाडी सरकारच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी केल्याप्रकरणी शहरातील अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.