जिल्ह्यातील ‘या’ पर्यटनस्थळांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश

नाशिक । प्रतिनिधी
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे आणि धरणे या ठिकाणी पर्यटनासाठी येण्यास पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे पर्यटनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान आजपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळॆ बंद करण्यात येत असून पुढील आदेश येईपर्यंत या ठिकाणी पर्यटकाना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळी पर्यटक गर्दी करतात. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.

बंद करण्यात आलेली ठिकाणे

ब्रम्हगीरी पर्वत, अंजनेरी पर्वत, दुगारवाडी धबधबा, हरिहर किल्ला, साल्हेर किल्ला, पहिने, भास्कर गड, रामशेज किल्ला, भावली धरण, वैतरणा धरण, गंगापूर धरण.