नाशिक । प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून त्या दृष्टीने नाशिक प्रशासन पाऊले उचलत आहेत. पहिल्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेत ओमायक्रोनने हजेरी लावली. मात्र ओमायक्रोन पेक्षा कोरोनाच जास्त डोकेदुखी वाढविणारा ठरत आहे. त्यामुळे ओमायक्रोनची धास्ती कमी असल्याचे लक्षात घेऊन नाशिक महापालिका जिनोम सिक्वेसिंग बंद करणार असून त्यासाठी १० हजार किट्सची खरेदीही रद्द केली आहे.
नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा पहिला रुग्ण सापडला. त्यामुळे प्रशासनाची पाचावर धारण बसली. त्यांनी नाना धावपळी सुरू केल्या. रुग्णाचा जिनोम सिक्वेन्स तपासून पुण्याच्या शासकीय प्रयोगशाळेतून खात्री करून घेण्याचे ठरले. ओमायक्रॉन टेस्टसाठी येणाऱ्या काळात दहा हजार किट् खरेदी करण्याचा निर्णयही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत घेतला. मात्र, आता बहुतांश रुग्ण ओमायक्रॉनचेच आढळत आहेत. बर त्यांचा डेल्टा इतका जास्त धोकाही नाही. हे पाहता महापालिकेने जिनोम स्किक्वेसिंग बंद करण्याचा निर्णय घेतला असून, किट्सची खरेदीही रद्द केली आहे.
सध्या नाशिक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे नाशिकसह ग्रह भागातही कोरोना चाचणी तसेच लसीकरणावर भर दिला जात आहे.तसेच दक्षतेचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यात सोळा कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. त्यात नाशिक जिल्हा रुग्णालय, मालेगाव जिल्हा रुग्णालय, पिंपळगाव रुग्णालयासोबतच कळवण, नांदगाव, येवला, इगतपुरी, वणी, सुरगाणा, पेठ येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी तब्बल अठराशे खाटांची संख्या उपलब्ध आहे. शिवाय ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा आहे.
तसेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासन सज्ज झाले असून दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनने लोकांचे प्राण गेले होते. मात्र आता नाशिकमध्येच ऑक्सिजनचा प्लांट उभारल्याने ऑक्सिजनची कमतरता भासणार नसल्याचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. त्यामुळे केवळ १३ मेट्रीक टन ऑक्सिजनची क्षमतेवरून पालिकेने तब्बल 3 कोटी रुपये खर्चून १४० मेट्रीक टन क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटपर्यंत मजल मारली आहे.