मंदिरातूनच देव चोरून नेण्याचा धक्कादायक प्रकार

नाशिक । प्रतिनिधी

मंदिरातूनच देव चोरून नेण्याचा धक्कादायक प्रकार सिडकोतील उत्तम नगर परिसरात घडला आहे. यामुळे देवाच्या भक्तांनी पोलिसांच्या ठाणे रूपी मंदिरात धाव घेतली असून देव चोरणाऱ्याचा लवकरात लवकर छडा लावण्याची विनंती अंबड पोलिसांना केली आहे.

नुकत्याच एक महिन्यापूर्वी उत्तम नगर येथील एकता चौक परीसरात श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली होती. तेथील स्थानिक नागरिकांनी दीड किलो पितळाच्या “दत्ताची मूर्ती” ची व मंदिराची स्थापना मोठ्या थाटामाटात व उत्साहात केली. त्या घटनेस एक महिना पूर्ण होत नाही, तोच चोरट्यांनी थेट याच देवाच्या मंदिरातच हात घालून मूर्तीची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

यामुळे संतप्त झालेल्या दत्तभक्त मंडळींनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेत चोरांना शोधण्यासाठी तक्रार अर्ज केला आहे. दरम्यान, सदर देवाची मूर्ती शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून या घटनेचा छडा आता पोलीस किती दिवसात व कसा लावतात हे बघणे आता कुतुहुलाचे ठरणार आहे.

दरम्यान दोनच दिवसापूर्वी येथील सिडको परिसरात घरफोडीच्या घटना उघडकीस आली होती. यामध्ये चोरटा हा परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता थेट मंदिरातूनच चोरी करण्याची मजल वाढल्याने पोलिसांनी तात्काळ याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.