सिन्नरफाटा परिसरात दोन गटात तुफान राडा

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेवर बोट ठेवणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. सिन्नर फाटा परिसरात दोन टोळक्यात तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेचा विडिओ व्हायरल झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार नाशिक च्या सिन्नर फाटा परिसरात अचानकपणे दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत तब्बल दहा ते पंधरा जण सामील होते. जमिनीच्या वादातून ही घटना घडली असून झालेल्या मारहाणीत वयोवृध्द इसमासह माहिलांना जबर मारहाण करण्यात आली आहे.

दरम्यान या व्हिडीओत काही व्यक्ती लाकडी दांडे, हॉकी स्टिकने जबर मारहाण करत असून विशेष म्हणजे महिलांना देखील मारहाण केल्याचे दिसते आहे. या घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

या मारहाणीत तीन ते चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर नाशिक रोड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याचा काम सुरू आहे.