ना गहू, ना हरभरा, इथं फक्त कांदाच कांदा!

येवला | पांडुरंग शेळके

येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी गहू, हरभरा, भाजीपाला पिकाला फाटा देऊन कांदा पिकाला अधिकचे प्राधान्य दिले असून यंदा विक्रमी कांदा लागवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे बघितले जाते. यंदाही रब्बी हंगामाचे गहू, हरभरा ही पिके न घेता शेतकऱ्यांनी कांदा लागवडीवर भर दिला आहे. मात्र दिवसेंदिवस कांदा पीक खर्चिक बनत चालले असून आठ पंधरा दिवसात येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात औषधांचा खर्च वाढत आहे. तसेच एकत्रित कांदा लागवड आल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली असून अधिक पैसे देऊन मजूर शोधावे लागत आहेत.

कांदा पिकात इतर पिकांच्या तुलनेत चार पैसे अधिक मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांना फाटा दिला आहे. यावर्षी मात्र मागील दोन-तीन वर्षाचा कांदा लागवडीचा विक्रम मोडत विक्रमी कांदा लागवड होत आहे .

मध्यप्रदेशातील मजुरांनी दिला आधार

सध्या येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड चालू असल्याने शेतकरी मिळेल त्या ठिकाणाहून मजूर आणून कांदा लागवड करत आहे. मजुरांची टंचाई भासू लागल्याने मध्य प्रदेशातील शेंदवा परिसरातील मजुरांना आणून कांदा लागवड केली जात आहे. त्यामुळे बाहेरील मजुरांनी कांदा लागवडीला आधार दिला आहे.

रोगट वातावरणाने कांदा उत्पादन घटणार

यंदा जरी विक्रमी कांदा लागवड होत असली तरी गेली पंधरा- वीस दिवसांपासून वातावरणात बदल होत असून दररोज दव आणि धुके पडत असल्याने लाल कांदा खराब झाला आहे. लागवड केलेला उन्हाळ कांदाही जमिनीत तग धरत नसल्याने, लाल कांद्या बरोबरच उन्हाळ कांदा लागवड संकटात सापडल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बिबट्याच्या वावर वाढला

सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाळं कांदा लागवड चालू असून याच काळात जऊळके, देशमाने परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे रात्री बेरात्री शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे.

ठिबक सिंचनाची जोड

या वर्षी मजुरांची टंचाई असल्याने अनेक शेतकऱी ठिबक सिंचनावर कांदा लागवड करत असून त्यामुळे पाणी भरण्यासाठी लागणारी मजुरीही वाचणार आहे.

डिसेंबरअखेर लागवड व पेरणी झालेली पिके

रब्बी कांदा- १३९७८
गहू-४१२७
हरभरा -२२४८
रब्बी मका- ५३१