हडबीच्या शेंडीवरून पडल्याने गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी

मनमाडजवळील हडबीची शेंडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आलेल्या दोन तरुणांचा तोल जाऊन ११० फूट खाली पडल्याने या दुर्घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने गिर्यारोहकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अनिल वाघ (नगर) व मयुर म्हस्के (नगर) अशी मृत्यू झालेल्या गिर्यारोहकांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्या वतीने हडबीची शेंडी (Shendi) या सुळक्यावर गिर्यारोहण मोहिमेचे आयोजन ०२ फेब्रुवारीला करण्यात आले होते. या मोहिमेत १८ जण सहभागी झाले होते. त्यात काही मुलींचाही सहभाग होता.

दुपारपर्यंत सर्व सहभागींचे यशस्वी आरोहण झाल्यानंतर सर्व सहभागींना खालच्या टप्प्यावर उतरवण्यात आले. शेवटचे तिघे जण उतरण्याच्या बेतात असताना त्यातील दोघे थेट ११० फूट खाली कोसळले. यात त्यांचा मृत्यू (Death) झाला. मृतांमध्ये तांत्रिक पथकाचे प्रमुख अनिल वाघ व मयुर म्हस्के यांचा समावेश आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहिमेतील इतर १२ जण सुखरूप आहेत. रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन करत सर्वांना सुखरूप पायथ्याशी आणण्यात यश मिळवले.

या अपघाताची माहिती मिळताच कातरवाडी येथील ग्रामस्थांनी हडबीची शेंडीवर धाव घेऊन बचावकार्य (Rescue Operation) सुरु केले. ग्रामस्थांनीच राबवलेल्या या बचावकार्यात सर्व सहभागींना संध्याकाळी उशिरापर्यंत खाली आणण्यात आले होते.