….म्हणून काँग्रेसने अजित पवारांच्या विरोधात मुख्यमंत्र्याकडे तक्रार

मुंबई । प्रतिनिधी
अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे काँग्रेस मंत्र्यांकडील विभागांच्या फाईल सर्रास अडवतात. काँग्रेस मंत्र्यांच्या विभागांना योग्य निधी दिला जात नाही, अशी टाकणार काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. आघाडीच्या घटक पक्षांना निधीचे समान वाटप व्हायला पाहिजे, अशी भूमिकाही शिष्टमंडळाने मांडली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळाला निधी वाटपात आपण स्वत: लक्ष घालतो, असे आश्वासन दिल्याचे समजते.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या ३ मार्चपासून सुरुवात होत आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडण्यात येणार आहेत. या पार्शवभूमीवर काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अजित पवार यांच्या विरोधात तक्रारींचा सूर लावला. काँग्रेसकडे सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, अदैवासी विकास, महिला आणि बालविकस अशी थेट जनतेशी संबंधित खाती आहेत. या खात्यांना यंदाच्या अर्थसंकल्पना योग्य निधीची तरतूद करावी, अशी मागणी ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.

राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांना भेटलो. काँग्रेसच्या मंत्र्यांच्या विभागांना निधी मिळत नाही, अशी आमची तक्रार होती. ऊर्जा विभाग अडचणीत आहे, वीज कापण्याची वेळ आली आहे. आदिवासी विभागाला सर्वसाधरण बजेटमधून निधी मिळत नाही. महामंडळाच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी पत्रकारांना सांगितले.

निधी वाटपाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. आता ते स्वत: यात लक्ष घालणार आहेत. मुख्यमंत्री स्वत: निधीच्या वाटपाच्या वादावर तोडगा काढणार आहेत, असे पटोले म्हणाले. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे चर्चा करून निर्णय घेतील, असे पटोले यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, अस्लम शेख, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचा समावेश होता.