नाशिक । प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसगाव शिवारात कोकणगाव-सुकेणे रस्त्यावर आज (दि.१७) गुरुवार दुपारी दिड ते पावणेदोन वाजेच्या सुमारास जीवरक यांच्या वस्तीवर लग्नघराला आग लागुन संपूर्ण संसार आगीच्या भक्षस्थानी सापडला; आग लागलेल्या घरापासुन अवघ्या दोनशे फुटावर संपूर्ण कुटुंब विवाह सोहळा साजरा करत असतांना दुसरीकडे घराला आग लागल्याने काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरसगाव येथील कोकणगाव-सुकेणे रस्त्यावरील सुर्यभान पंढरीनाथ जीवरक यांच्या जुन्या राहत्या कौलारु माडीच्या घराला गुरुवार (दि.१७) रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. घरापासुन अवघ्या दोनशे फुटावर शेतात त्यांच्या नातीचा विवाह सोहळा पार पडत होता.
याकरीता संपूर्ण कुटुंब हे विवाह सोहळयात दंग असतांना त्यांच्या घरातुन धुर निघत असल्याचे विवाह सोहळयात येणा-या पाहुणे मंडळीच्या लक्षात आले , त्यानंतर जीवरक कुटुंबियांनी तत्काळ घराकडे धाव घेतली असता आगीने रौद्रस्वरुप धारण केले केले होते. या आगीत घरातील सर्व संसार, कपडे, फर्नीचर, धान्य व इतर वस्तु आगीच्या भक्षस्थानी सापडल्या असुन लाखों रूपयाचे नुकसान झाले आहे.
दरम्यान एचएलएल ओझर व पिंपळगाव बसवंत येथील अग्नीशमन दलाच्या दोन बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर तासाभरात नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत जीवितहानी झाली नसुन माञ वित्तहानी मोठी आहे. वीजमीटरमधील शार्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज जीवरक कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.