नाशिक । प्रतिनिधी
करोनासारख्या इतरही सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म जीवाणूंपासून होणारे संभाव्य प्राणघातक आजार टाळण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनने ‘बीएसएल-3 कंटेनमेंट प्रयोगशाळा’ विकसित केली आहे. सुमारे २५ कोटी रुपयांच्या या मोबाईल व्हॅनचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते आज (दि. १८) रोजी महाकवी कालिदास कलामंदिर येथे होत आहे.
आरोग्यसेवेतील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी ‘प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन’ ही देशातील सर्वात मोठी योजना तयार केली आहे. या मिशनमार्फत ‘बीएसएल-3 कंटेनमेंट प्रयोगशाळा’ बनवण्यात आली आहे. राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते होणाऱ्या लोकार्पण कार्यक्रमास डीएचआर आणि आयसीएमआरचे महासंचालक प्रा.डॉ. बलराम भार्गव, डीएचआर सहसचिव अनुनगर, आयसीएमआर-एनआयव्हीचे शास्त्रज्ञ तसेच नाशिकचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जैव-सुरक्षा सज्जता आणि महामारी संशोधनाला बळकटी देण्यासाठी देशात ४ मोबाईल जैवसुरक्षा स्तर -3 प्रयोगशाळा प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळांमध्ये निदान आणि संशोधनाशी सुसंगत सुविधा व उपकरणे आहेत. ज्यात देशी आणि विदेशी सूक्ष्मजीव यावर संशोधन करण्यात येणार आहे. यातील सेवकांना व्यापक प्रशिक्षण दिले जाणार आहे. बीएसएल-3 प्रयोगशाळा मोठ्या आरोग्यसेवा आणि संशोधन संस्थांशी संलग्न असतील. या प्रयोगशाळा प्रगत व्हेंटिलेशन व कम्युनिकेशन सिस्टीमसह अनेक सुरक्षा खबरदारीने सुसज्ज असतील. त्यामुळे समाजाला धोका कमी होईल. ही व्हॅन उच्च जोखमीच्या संसर्गजन्य रोगाच्या उदयादरम्यान देशाच्या प्रयोगशाळेची प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देईल.
अलीकडच्या वर्षात अनेक राज्यांना वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागला. पश्चिम घाट प्रदेशात एव्हीयन इंफ्ल्यूएन्झा, क्यासनूर वनरोग, राजस्थानमध्ये झिका आणि केरळमध्ये निपाह विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता. प्रादुर्भाव/क्षेत्रतापासणी/अत्याधिक संसर्गजन्य/संभाव्यपणे प्राणघातक विषाणूंच्या सर्वेक्षणाचा समावेश असलेल्या क्षेत्रीय कार्यासाठी ही ‘बीएसएल-3 प्रयोगशाळा’ आवश्यक आहे. रेल्वे/रस्तेसेवेने जे भाग चांगल्या पध्दतीने जोडले गेलेले नाहीत अशा भागात ही प्रयोगशाळा वेळेवर आणि जलदगतीने ऑनसाईट निदान व अहवाल देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. दुर्गम व आदिवासी भागातील सामान्य लोकांना या सुविधेचा लाभ होणार आहे. राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या प्रयत्नाने देशातील दुसरी व्हॅन नाशिकमध्ये उपलब्ध होत आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात ही सेवा उपलब्ध होत आहे.