काँग्रेस आहे म्हणून महाविकास आघाडीची सत्ता : बाळासाहेब थोरात

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात जरी महाविकास आघाडीची सत्ता असली तरी हि सत्ता काँग्रेसमुळे असून या तिन्ही पक्षात काँग्रेसचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

ते नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राज्यात काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, फक्त आमचे आमदार कमी असल्याने आम्ही तिसऱ्या नंबरला आहोत. मात्र या तिन्ही पक्षात काँग्रेसचे महत्व अधिक असून आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडी सरकारची सत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्वांमुळे सरकारचे काम चांगले सुरू असून सरकारमध्ये निधी वाटपात असमानता नाही, विभागानुसार निधी वाटप केला जातो, त्याप्रमाणे काँग्रेसला निधी मिळतो.

परीक्षा निःपक्षपातीपणे व्हाव्यात ..
अनेक परिक्षा भरती घोटाळे झाले असून जे झाले ते चुकीचे झाले आहे. ज्या संस्था परीक्षा घेतात, आमचा त्यावरच आक्षेप असुन ज्या विश्वासार्ह संस्था आहेत, त्यांच्याकडे जबाबदारी द्यावी. जेणेकरून भरती प्रक्रियेत गोंधळ होणार नाही.

प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवायचाय…
प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवायचा आहे, त्यामुळे काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळेच आम्ही भाजपा ला दूर ठेवण्यासाठी नवी मुंबईत एकत्र येत आहोत. भाजपचे चंद्रकांत पाटील यांना रात्री सत्तते येण्याचे स्वप्न पडतात आणि सकाळी ते बोलत असतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी काही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. छत्रपती शिवरायांबद्दल पाटील यांचे विधान चुकीचे असून शिवाजी महाराज श्रद्धास्थान आहेत, त्यांना मर्यादित, छोटे करू नये, ते व्यापक होते रयतेचे राजे होते.

राजकारण हा खेळ
राजकारण सुद्धा काही बाबतीत खेळा सारखे असते. त्यामुळे हार जीत होत असते. या हार जीतवर विचारमंथन झाले पाहिजे. नगरपालिका निवडणुका हा गेम आहे, काळजीपूर्वक खेळला पाहिजे. काँग्रेसमध्ये असलेले नाना पटोले अनुभवी नेते आहेत, काँगेसच्या मुशीतील आहेत, म्हणून खासदारकी सोडून काँग्रेस मध्ये आलेत, त्यांना मी सल्ला नाही देणार. नाना पटोले आक्रमक आहेत, शेवटी राजकारण मध्ये सर्वच व्हरायटी लागते, आम्हाला जसे नेतृत्व पाहिजे तसे मिळाले. नाना पटोलेच्या आक्रमकपणा मुळे पक्षात कोणी नाराज झाले तरी त्यांच्या लक्षात येईल.

एसटी बांधवानो जास्त ताणू नका…
एसटी कामगार बांधवांनी आता समजून घेतले पाहिजे, किती ताणायचे हे ठरवावे, सरकारने जे द्यायचे तेवढे दिले आहे. परंतु सरकार सामावून घेऊच शकत नाही. भाजप सरकारने देखील त्यावर निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे आता एसटी कामगारांनी आता कामावर रुजू व्हावे, जर आता त्यांनी ऐकले नाही तर कारवाईचे निर्णय घ्यावे लागतील. अशा इशारा देखील थोरात यांनी कामगारांना दिला आहे.