नाशिक पोलिस एक्शन मोडमध्ये, ‘ही’ मोठी कारवाई

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात नाशिक पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे.

दरम्यान नाशिक पोलिसांनी काल केलेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सहा तडीपारांना अटक केली आहे. त्यामुळे इतर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत आठ गुन्हेगारांच्या घरी झडती घेतली असता धारदार शस्त्रास्त्र सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नाशिक मध्ये रोज एक ना अनेक गुन्हे घडत असून या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनला सुरवात केली आहे. काल नाशिकमधील १३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन झाले.

खऱ्या अर्थाने गुन्हेगारीला थोपवायचे असेल तर अशा पद्धतीने कोंबिंग ऑपरेशनची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.