रेशनबाबत ग्राहकांना माहिती मिळणे आवश्यक : मेघा दराडे

नाशिक । प्रतिनिधी

स्वस्त धान्य दुकानातील मिळणाऱ्या अन्नधान्याची मशिनमधून निघालेली पावती शिधा पत्रिका धारकांना मिळावी, शासनाच्या विविध योजनांची माहिती दुकानाच्या दर्शनी भागी लावावी, ग्राहकांना एसएमएस सुविधा द्यावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मेघा दराडे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.

स्वस्त धान्य वितरण सरकारी नियोजनाप्रमाणे केले जाते. मात्र दुकानदार मशीनमधील पावती ग्राहकांना देत नाही. त्यामुळे आपल्याला किती धान्य मिळाले व किती धान्य मिळणार होते, याबाबत माहिती उपलब्ध होत नाही. शासनाच्या विविध योजनांची माहिती स्वस्त धान्य दुकानाच्या अग्रभागी असणे आवश्यक असून या सूचनांचे बोर्ड लावणे बंधनकारक करावे, मागील महिन्यात पुरेसा कोटा उपलब्ध न झाल्यामुळे तालुक्यातील सर्व दुकानांतून धान्याचे वाटप झाले नाही.

त्यामुळे दुकानदारांनी नोंव्हेबर व डिसेंबरमध्ये उर्वरित धान्याचे वाटप करणार असल्याचे लिहणे आवश्यक आहे. ग्राहकांना योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. प्रशासनाने तातडीने दखल घेत दुकानदारांना सूचना द्याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दराडे यांनी दिला आहे.

निवेदनावर प्रियंका द्विवेदी, रुबिना सैय्यद, अंजुम शेख, स्वाती शिंदे, ऍड. भाग्यश्री ओझं, प्रतीक्षा आनप, ऍड. वर्षा काहीरनार यांच्या सह्या आहेत.