गीतकार जावेद अख्तर यांच्या संमेलन उपस्थितीवरून वादंग

नाशिक । प्रतिनिधी

मराठी साहित्य संमेलनास्थळी गीतकार जावेद अख्तर यांच्या उपस्थितीवरून वादंग उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेले मराठी साहित्य संमलेन नाशकात होत आहे. या संमलेनाचे उदघाटन प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र यासोबतच विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार असेलल्या जावेद अख्तर यांच्या उपस्थितीवरून पुण्यातील एका संस्थेने आक्षेप घेतला आहे.

मराठी राज्यभाषा असून जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा सहावा क्रमांक लागतो. या भाषेने अनेक विचारवंत साहित्यिक या मराठी मातीला दिले. मात्र हिंदूंवर अन्याय झाल्यांनतर मूक गिळून बसणारे जावेद अख्तर संमलेनाचे प्रमुख पाहुणे कसे? असा सवाल या संस्थेने उपस्थित केला आहे. त्यामुळे संमलेनापूर्वीच वादंग होण्याची शक्यता निर्माण झाल्याने संमेलन आयोजक यावर काय भूमिका घेतात याकडे नाशिक करांचे लक्ष लागले आहे.

तर 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाच्या उद्घाटकाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. तसेच संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली.