धक्कादायक ! कौमार्य चाचणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नाशिक । प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून कौमार्य चाचणी च्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लढा हा कायम आहे. कौमार्य चाचणीसह इतर अनेक घटनांना थांबविण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यश आले आहे. यापूर्वी झालेल्या घटनांमध्ये पुरावे मिळत नव्हते. मात्र आता कौमार्य चाचणीचा व्हिडिओचा व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून कौमार्य चाचणी बाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वेळोवेळी जनजागृती केली आहे. परंतु या सर्वांना डावलून अनेकदा कौमार्य चाचणी केली जाते. जात पंचायतीच्या माध्यमातून या गोष्टी घडत असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नेहमी याबाबत आवाज उठवत असते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाने जात पंचायतीची अशी भयानक कुप्रथा समाजासमोर आणली आहे. याबाबतचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. प्रथमच कौमार्य चाचणीबाबत असा सबळ पुरावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हाती लागला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २०१८ सालचा हा व्हिडिओ असल्याच प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गेल्या नऊ वर्षांपासून जात पंचायत मूठमाती अभियान चालवतो. या अंतर्गत विविध समाजातील जातपंचायतींद्वारे पुरस्कृत अनेक अनिष्ट,अघोरी अन्यायकारक रूढीं, प्रथां समितीने थांबवल्या आहे.आहे. समितीच्या पुढाकाराने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा सुद्धा संमत झालेला आहे. असे असतानाही, आजही एका समाजात लग्नानंतर वधूची कौमार्य परीक्षा घेतली जाते. व्हायरल झालेल्या व्हिडीओ बाबत आता पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.